समाजभानाची अग्निपरीक्षा!
हल्ली मतदाराच्या मनात नेमके काय शिजते आहे याचा थांगच लागेनासा झाला आहे. मतदारांच्या मानसिकतेचा हा भलताच ‘ट्रेंड’ भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकणारा ठरत आहे. एकप्रकारे या बदलत्या समाजभानाची ही अग्निपरीक्षाच आहे.

मतदारराजा हल्ली भलताच हुशार झाला आहे. लाटेत तो वाहवत जातोच असे नाही. लोकसभेतील देदिप्यमान यशाची भारतीय जनता पक्षाला सर्वच राज्यात पुनरावृत्ती करता आलेली नाही. किंबहुना उत्तर प्रदेशात तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला सपशेल पराभवाचा सामना करावा लागला. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आदी राज्यांत भाजपला दणदणीत यश मिळाले असले तरी अल्पावधीतच नवी दिल्लीने तर या पक्षाचे थेट नाकच कापले. लोकसभा निवडणुकीत नवी दिल्लीत सर्व जागा जिंकणाऱ्या या पक्षाला विधानसभेत अवघ्या तीन जागा मिळतात, यावरून मतदारांच्या हुशारीचा अंदाज यावा. काही वर्षांपूर्वी एका ठिकाणी यश मिळाले की दिल्लीपासून गल्लीपर्यंत ते झिरपत रहायचे. पण आता तशी स्थिती राहिलेली नाही. किंबहुना मतदाराच्या मनात नेमके काय शिजते आहे याचा थांगच लागेनासा झाला आहे. त्यामुळेच मतदान चाचण्यादेखील बहुतांशी फसत आहेत. म्हणजे त्यांचा ढोबळ अंदाज बरोबर येतो, पण तंतोतंत काही येत नाही. उदाहरणच द्यायचे झाल्यास लोकसभेत भाजप आघाडी सत्तेवर येणार हा अंदाज सर्वच चाचण्यांनी दिला होता. पण, या पक्षाला स्वबळावरच बहुमत मिळेल हे कोणत्याच अंदाजात नव्हते. दिल्ली निवडणुकीतही आम आदमी पार्टी जिंकणार हे सगळेच सांगत होते. मात्र, त्यांना एवढे पाशवी बहुमत मिळेल याचे भविष्य कोणीही सांगितले नव्हते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. मतदारांच्या मानसिकतेचा हा भलताच ‘ट्रेंड’ भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकणारा ठरत आहे. या अस्थिर समाजभानाचा पाहिजे तसा अभ्यास झालेला नाही. मतदारांच्या मानसिकतेचे हे स्थित्यंतर समाजशास्त्रीय अभ्यासाचा विषय बनला आहे. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव हे एक त्याचे कारण देता येईल. मात्र, केवळ तेच एकमेव कारण म्हणता येणार नाही. समाजमन घडायला बराच काळ लागतो, असे सांगितले जाते. किंबहुना तसा आपला अनुभवदेखील आहे. तरीही गेल्या काही वर्षांत जे जे घडतेय, ते ते नंतर चक्क बिघडतांना दिसते आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीच्या आंदोलनाला न भुतो... न भविष्यती असा प्रतिसाद मिळाला. या उक्तीचा नेमका प्रत्ययदेखील लागलीच आला. कारण नंतरच्या अण्णांच्या आंदोलनाकडे लोकांनी चक्क पाठ फिरविली. म्हणजेच न भविष्यती हे त्यांच्याच बाबतीत तंतोतंत खरे ठरले! केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पहिल्या निवडणुकीत भरीव यश मिळाले. ते सत्तेवरही आले. मात्र, नंतरच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पार सफाया झाला. हाच अनुभव काही कालावधीनंतर झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपलाही आला. लोकसभा निवडणुकीत देदिप्यमान यश मिळविलेल्या शिवसेनेला तेवढे यश विधानसभेत मिळाले नाही. मुंबई ही शिवसेनेची जान! पण तिनेही विधानसभेत या वाघाला थारा दिला नाही. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला विधानसभा निवडणुकीत घसघशीत यश मिळाले पण लोकसभेत पक्षाचा पार पालापाचोळा झाला. मात्र पुन्हा लागलीच झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी हाच अनुभव भाजपला देऊन आपले वेगळेपण दाखवून दिले. आम्हाला कोणी गृहित धरू नका हा मतदारांचा संदेशवजा इशारा मानला जात असला तरी त्याची जातकुळी एकाच मापात सर्वांना सारखेच तोलणारी नसते. त्यामुळेच मतदारांना नेमके काय हवे असते याचा अंदाज येणे दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. आसेतु हिमाचल एकच पक्ष अथवा एकच विचारधारा आपल्याकडे शक्य नाही असे आपण गृहितच धरले असले तरी साधारणत: काही वर्षांच्या जित्याजागत्या अनुभवातून उत्तर भारतात काँग्रेस किंवा भाजप, दक्षिणेत प्रादेशिक पक्ष किंवा काँग्रेस, पूर्वेकडील राज्यात स्थानिक वा प्रादेशिक अस्मिता कुरवाळणारे पक्ष अशी ढोबळमानाने विभागणी केली गेली आहे. गेल्या काही वर्षांत त्याला तडे जायला सुरुवात झाली तेव्हाच खरे तर मतदारांच्या बदलत्या मानसिकतेचा किंवा बदलू पाहणाऱ्या समाजभानाचा अदमास यायला हवा होता. परंतु, आपल्याकडे पायाखाली पाहण्याची तसेच फार खोलवर विचार करण्याची मानसिकता नसल्याने या स्थित्यंतराच्या अंगुलीनिर्देशाकडे पाहिजे तेवढे गांभीर्याने पाहिले गेले नाही. सर्वच संशोधन क्षेत्रातील आपली झेप पाहता हे असे होणे स्वाभाविकही म्हणावे लागेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आसाममधील आसाम गण परिषद, मायावतींचा बहुजन समाजवादी पक्ष, मुलायम सिंहांचा समाजवादी पक्ष, आंध्र प्रदेशातील तेलगू देसम, कर्नाटकातील देवेगौडांचा जनता दल (सेक्युलर) यासारख्या पक्षांचे नेत्रदीपक उदय व पाठोपाठ त्यांचा भ्रमनिरास हे अलिकडच्या काळातील समाजभानाच्या बदलत्या अभिरूचीचे द्योतक मानावे लागेल. या पंक्तीत आता आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, तेलंगण राष्ट्र समिती हे पक्ष येऊ घातले आहेत. सुपातले जात्यात असे फारतर म्हणता येईल. या पक्षांना अद्याप भ्रमनिराशेच्या मांडवाखालून जायचे आहे, पण तरीही प. बंगालमध्ये सध्या ममता दीदींविरोधात ज्या पद्धतीचे वातावरण आहे ते पाहता हा पक्ष सर्वात आधी सुपातून जात्यात जाऊ शकेल. तेलंगण राष्ट्र समिती हा पक्ष तर मुळातच प्रादेशिक अन् भावनिक अस्मितेच्या जोरावर सत्तेत आला आहे. ही भावना ओसरल्यावर तेदेखील जात्यात जाण्यास वेळ लागणार नाही.
राजकारणाबद्दल एक प्रकारची द्वेषमुलक भावना जनसामान्यांत असते असे बऱ्याचदा बोलले जाते. तसा अनुभव सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीवरून येतो. मात्र, अलिकडे ही भावना व्यक्त करण्याची प्रेरणा सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक उठावदार व ठसठशीत झाली आहे. केवळ आंदोलने करून निषेध नोंदवण्याऐवजी प्रत्यक्ष मतदानात भाग घेऊनच वाईटांना धडा शिकवायचा असा ट्रेंड दिसून येत आहे. तरीही एक बाब राहून राहून खटकते अन् ती म्हणजे, चार महिन्यांपूर्वी डोक्यावर घेतलेल्या एखाद्याला लागलीच पायाखाली तुडवण्याची आसुरी घिसाडघाई या समाजभानात येते कुठून? एवढी उतावीळ, इन्स्टंट प्रेरणा इतक्या कमी वेळात तयार कशी होते? ज्याला निवडून दिले किंवा ज्याच्यावर काही अपेक्षेने विश्वास टाकला त्याला ते सिद्ध करण्याची उसंतसुद्धा ही नवी पिढी द्यायला तयार नाही. सगळेच इन्स्टंट हवे हा फाजिल आशावाद एक दिवस गोत्यात आणेल, अशी भीती वाटत राहते. ज्या मोदींचा या सोशल मीडियाने उदोउदो केला त्याच मोदींवरील याच माध्यमातील ताज्या पोस्ट पाहिल्यावर हे जे काही चालले आहे आहे त्याची तीव्रता लक्षात यावी. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, हँगआऊट, यू ट्युब यासारख्या सोशल मीडियावरील चर्चा व उपहासात्मक व्हिडीओ बघितले तर अपेक्षांचा हा नवा भस्मासूर काय करू शकेल याचा अंदाज येतो. अपेक्षा व त्याची पूर्ती यातील अंतर मानायलाच ही नवी पिढी तयार नाही, हे अधिक चिंतादायक आहे. या माध्यमांमध्ये सर्वांची खेचण्याची अथवा फिरकी घेण्याची चढाओढ दिसत असली तरी पुष्कळ गंभीर मुद्देही चर्चिले जात असल्याने हा थिल्लरपणा समजून सोडूनही देता येत नाही. चंचलता मग ती कोणत्याही क्षेत्रात असो, त्यात स्थैर्याची शाश्वती नसतेच. मग आता तर देशाचे वा एखाद्या प्रांताचे भवितव्य ठरविणाऱ्या निवडणुकांमध्ये जर ती येणार असेल तर मग पुढे काय होणार? पाशवी बहुमत मिळवूनही आम आदमी पक्षाची अन् त्याच वेळी दणदणीत यश मिळवूनही भारतीय जनता पक्षाची सध्या जी काही कुतरओढ चालू आहे ही तर या नव्या समाजभानाची झलक आहे. भविष्यात आणखी काय वाढून ठेवले आहे याची चुणूक यातून दिसत असली तरी यातील धोक्यांची जाणीव राजकीय पक्षांना झाली अन् त्यांनी त्यापासून बोध घेऊन पक्षीय विचारधारा, ध्येयधोरणे, मतदारांना गृहित धरण्याची वृत्ती यात काही मूलगामी सुधारणा केल्या तर हीच धोक्याची घंटा कदाचित इष्टापत्ती ठरू शकेल. तसेच होवो अशी आपण आशा करूया, शेवटी आपल्या हातात दुसरे काय आहे?
No comments:
Post a Comment