Tuesday, 7 April 2015

Marathi sahitya

मराठी कादंबरी :

बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली ‘यमुनापर्यटन’ (१८५७) ही मराठीतीलच नव्हे तर हिंदुस्थानातील पहिली कादंबरी समजली जाते. व्यक्ती आणि समाज यांच्या संबंधात अनेक प्रश्र्न निर्माण होत असतात. त्यांच्या संदर्भात निश्र्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराला काही सांगावेसे वाटते. ‘यमुनापर्यटन’ या पहिल्याच कादंबरीत अशी कृतिप्रधानता दिसते. तत्कालीन विधवांच्या प्रश्र्नांवर ही कादंबरी भेदक प्रकाश टाकते. हिंदू विधवांना ज्या दिव्यातून जावे लागत असे त्याचे चित्रण नायिका यमुनाच्या दृष्टिकोनातून कादंबरीकाराने अतिशय प्रभावी पद्धतीने केले आहे. बाबा पद्‌मनजींनी सुरू केलेली ही कादंबरीची कृतिप्रधान परंपरा पुढे अनेक कादंबरीकारांनी समर्थपणे चालवली. हरी नारायण आपटे, वामन मल्हार जोशी, साने गुरुजी, विभावरी शिरुरकर, भाऊ पाध्ये, अनंत कदम, दीनानाथ मनोहर इ. लेखकांनी ही परंपरा समृद्ध केली.  मराठी कादंबरी परंपरेतील पुढचे महत्त्वाचे नाव येते ते लक्ष्मणशास्त्री मोरेश्र्वरशास्त्री हळबे यांचे! ‘मुक्तामाला’ (१८६१) ही त्यांची उल्लेखनीय कादंबरी होय. रंजक कथानकातून, वास्तवाच्या आधारे अवास्तव शोधून, त्याची रीतीप्रधान मांडणी करणारी ही कादंबरी परंपरा असल्याचे भालचंद्र नेमाडे म्हणतात. याच परंपरेत पुढे ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, माडखोलकर, पु. भा. भावे, पु.शि. रेगे, चिं. त्र्यं. खानोलकर, रंगनाथ देशपांडे, माधव कानिटकर, चंद्रकांत काकोडकर, योगिनी जोगळेकर, कुसुम अभ्यंकर इत्यादींनी कादंबरीलेखन केले. रा. भि. गुंजीकर यांची ‘मोचनगड’ ही कादंबरी १८७१ मध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीच्या रूपाने मुळात नसलेल्या वास्तवाचा आभास निर्माण करणारी प्रतिकृतिप्रधान कादंबरीची परंपरा निर्माण झाली. गुंजीकर, चिं. वि. वैद्य, नाथमाधव, वि. वा. हडप, रणजित देसाई, वि.स.खांडेकर, मनमोहन नातू, ना.सं.इनामदार, शिवाजी सावंत, गो.नी. दांडेकर, बाबूराव अर्नाळकर, नारायण धारप, श्रीकांत सिनकर अशी ही परंपरा दाखवता येते.
इ.स. १८७४ ते १९२० या काळातील मराठी कादंबर्‍यांची संख्या जवळजवळ सातशे असून ह. ना. आपटे यांच्या पूर्वकाळातील (इ.स. १८८५ पूर्व) बहुतेक कादंबर्‍या अद्भुतरम्य कथानके रंगवणार्‍या होत्या. ‘प्रेमबंधन’, ‘सुवर्णमालिनी’, ‘शृंगारमंजिरी’, ‘मनोरंजक राजहंस व विजया’, ‘मौक्तिकमाला आणि मदनविलास’, ‘पीयूषभाषिणी आणि मदिरामंजिरी’ ही त्या कादंबर्‍यांची नावे सूचक आहेत.
याच काळात ज्यांचा इंग्रजी भाषेशी व इंग्रजी वाङ्मयाशी परिचय झाला, त्यांच्या कादंबरीलेखनावर इंग्रजी कादंबरीच्या तंत्राचा प्रभाव पडला. रेनॉल्डस या लोकप्रिय कादंबरीकाराच्या कादंबर्‍यांची रूपांतरे-भाषांतरे त्या काळात झाली. उदा. ‘Seemstress’  या कादंबरीचे ‘वज्रेश्वरी अथवा शिवणकाम करणारी’ किंवा ‘Soldier's Wife’  चे ‘वीरपत्नी’ हे भाषांतर.
ह. ना. आपटे यांच्या उदयापूर्वीची एक वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी म्हणून महादेव विठ्ठल रहाळकर यांच्या ‘नारायणराव आणि गोदावरी’ (१८७९) या कादंबरीचा उल्लेख करावा लागतो. रचनेचे कौशल्य, आकर्षक प्रसंग निर्मिती, मनोहर व्यक्तिचित्रे, तसेच स्वाभाविक व वास्तव वातावरण ही या कादंबरीची वैशिष्ट्ये आहेत.   इ.स. १८८५ मध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली. राष्ट्रवादी विचारांचे वारे देशात वाहू लागले. आगरकर-रानडे-गोखले यांचे सुधारणावादी विचार प्रभाव गाजवू लागले होते. अशा काळात हरिभाऊ आपटे यांच्या सामाजिक आणि ऐतिहासिक कादंबर्‍यांची निर्मिती झाली. ‘गणपतराव’, ‘पण लक्षात कोण घेतो?’, ‘मी’ व ‘यशवंतराव खरे’ या चार सामाजिक कादंबर्‍या, आणि ‘उष:काल’, ‘सूर्योदय’, ‘गड आला पण सिंह गेला’ आदी ऐतिहासिक कादंबर्‍यांचे लेखक म्हणून मराठी कादंबरीच्या इतिहासात हरिभाऊंचे कर्तृत्व लक्षणीय आहे.
हरिभाऊंच्या कादंबर्‍यांमुळे ‘कादंबरी’ या वाङ्मयप्रकाराला महाराष्ट्रात लोकप्रियता लाभली. रसिकांची कादंबरी-वाचनाची भूक भागवण्यासाठी अनेक ग्रंथमाला/पुस्तकमाला या काळात उदयाला आल्या. उदा. मनोरंजक व नीतिपर पुस्तकमाला (१८८९), मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळींची पुस्तकमाला (१९०२), भारतगौरव ग्रंथमाला (१९१०) इत्यादी. कादंबरीच्या निर्मितीचे आणि प्रसाराचे फार मोठे कार्य या मालांनी केले.
ह. ना. आपटे यांच्या नंतरच्या मराठी कादंबरीकारांत नाथमाधव (द्वारकानाथ माधवराव पितळे), वि.सी. गुर्जर, वा. गो. आपटे हे महत्त्वाचे कादंबरीकार होत. ‘सावळ्या तांडेल’, ‘विहंगवृंद’, ‘डॉक्टर कादंबरी’, ‘विमलेची गृहदशा’ ह्या नाथमाधव यांच्या कादंबर्‍यांतून स्त्रीशिक्षण, पुनर्विवाह, प्रौढविवाह इत्यादी तत्कालीन सामाजिक प्रश्र्नांचा ऊहापोह केलेला आढळतो. मात्र त्यांच्या सामाजिक कादंबर्‍यांपेक्षा ते ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून मराठी वाचकाला परिचित आहेत. ‘स्वराज्याचा श्रीगणेशा’, ‘स्वराज्याची घटना’ ह्या त्यांच्या ऐतिहासिक कादंबर्‍या प्रसिद्ध आहेत. वि.सी. गुर्जर यांच्या ‘देवता’, ‘शशांक’, ‘जीवनसंध्या’, ‘असार संसार’ वगैरे बंगाली कादंबर्‍यांची भाषांतरे प्रसिद्ध आहेत. वा. गो. आपटे यांनीही बंगाली कादंबर्‍यांची मराठी रूपांतरे केली आहेत. त्यांनी संपूर्ण बंकिमचंद्र मराठीत आणले!  त्या वेळच्या महाराष्ट्रातला स्त्रीवर्गही काही प्रमाणात वाङ्मयनिर्मिती करण्याइतका शिक्षित आणि जागृत झाला होता.हरिभाऊंच्या समकालीन काशीताई कानिटकर यांची ‘रंगराव’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली.
ना. ह. आपटे यांनीही अनेक सामाजिक आणि ऐतिहासिक कादंबर्‍या लिहिल्या. त्यांपैकी ‘वैभवाच्या कोंदणात’, ‘भाग्यश्री’, ‘याला कारण शिक्षण’, ‘पहाटेपूर्वीचा काळोख’ आदी विशेष उल्लेखनीय आहेत. समाजप्रबोधनाची तळमळ आणि प्रामाणिकपणा यांचा प्रत्यय त्यांतून येतो.
तंत्रात्मक कौशल्याने लोकप्रियता मिळवणार्‍या कादंबर्‍या या काळात मोठ्या प्रमाणावर लिहिल्या गेल्या. तंत्रदृष्ट्या सदोष भासणारी पण तात्त्विक, वैचारिकदृष्ट्या महत्त्वाची अशी ‘रागिणी’ ही कादंबरी वामन मल्हार जोशी यांनी लिहिली. पुस्तकरूपाने ती प्रसिद्ध होण्यापूर्वी ‘मासिक मनोरंजन’ मधून १९१४ साली ती क्रमश: प्रसिद्ध झाली. ‘रागिणी’ मुळे मराठीत तत्त्वचर्चात्मक कादंबरीचा उदय झाला. त्यानंतर वामन मल्हारांनी ‘आश्रमहरिणी’ (१९१६), ‘नलिनी’ (१९२०) या कादंबर्‍या लिहिल्या. स्त्री-स्वातंत्र्याचा आग्रहाने पुरस्कार करणारी निर्भय, बुद्धिमान नायिका त्यांनी रंगवली. तत्कालीन महत्त्वाच्या अनेक सामाजिक प्रश्र्नांना या कादंबर्‍यातून स्थान मिळाले. ‘सुशीलेचा देव’, ‘इंदू काळे व सरला भोळे’ या कादंबर्‍यांतून त्यांनी मराठी कादंबरीला नवे तांत्रिक सौंदर्य प्राप्त करून दिले. प्रगतिशील सामाजिक तत्त्वज्ञानाच्या पुरस्काराच्या दृष्टीने वामन मल्हारांच्या कादंबर्‍यांना साहित्याच्या इतिहासात विशेष महत्त्वाचे स्थान आहे. मुख्यत: स्त्रीजीवनविषयक प्रश्र्न सहानुभूतीने मांडण्याचे श्रेय त्यांना दिले पाहिजे. परंपरागत रूढ समजुतींच्या चौकटीत होणार्‍या कुचंबणेतून बाहेर पडण्यासाठी धडपडणारी नवी स्त्री त्यांनी चित्रित केली. विशेषत: ‘सुशीलेचा देव’ (१९३०) या कादंबरीत सुशीलेच्या रूपाने नव्या स्त्रीचे मोठे विलोभनीय, स्पृहणीय असे दर्शन त्यांनी घडवले.   कादंबरीच्या प्रयोजनासंबंधी आणि कादंबरीलेखनाच्या पद्धतीसंबंधी स्वत:चे असे खास व ठाम तत्त्वज्ञान असलेले ना.सी. फडके हे मराठीतील अतिशय लोकप्रिय कादंबरीकार. १९२५ साली ‘कुलाब्याची दांडी’ ही कादंबरी त्यांनी लिहिली. तेव्हापासून जवळपास सत्तर कादंबर्‍यांची निर्मिती त्यांनी केली. विस्मयाचे सौम्य धक्के देणारी, वाचकाचे कुतूहल सतत जागे ठेवणारी कथानकाची गुंफण, कलात्मक-प्रत्ययकारी व रेखीव पात्रदर्शन, ‘अगदी खरेखुरे वाटावे’ असे संवाद आणि भाषाशैलीतील लाडिकपणा या गुणविशेषांमुळे फडके लोकप्रिय कादंबरीकार ठरले. ‘अटकेपार’, ‘दौलत’, ‘जादूगार’, ‘उद्धार’, ‘निरंजन’ या त्यांच्या प्रसिद्ध कादंबर्‍यांच्या अनेक आवृत्या निघाल्या.
फडके यांचेच समकालीन असे मराठीतील दुसरे कादंबरीकार म्हणजे वि.स.खांडेकर होत. `हृदयाची हाक' ही त्यांची पहिली कादंबरी १९३० साली प्रकाशित झाली. नंतर ‘कांचनमृग’, ‘दोन ध्रुव’, ‘उल्का’, ‘हिरवा चाफा’, ‘दोन मने’, ‘क्रौंचवध’, ‘अमृतवेल’, ‘ययाति’ अशा एकाहून एक सरस कादंबर्‍यांतून त्यांनी ध्येयवादी नायक आणि त्यागी, सुंदर नायिका रंगवल्या. त्यांच्या कादंबर्‍यांतून दीनदलितांबद्दल त्यांना अंत:करणापासून वाटणारा जिव्हाळा आणि स्वार्थत्यागसंपन्न जीवनाविषयी वाटणारी ओढ व्यक्त होते. त्यांच्या ‘ययाति’ या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आणि वि. स. खांडेकर हे मराठी साहित्यातील पहिले ‘ज्ञानपीठ’ विजेते साहित्यिक ठरले. फडके-खांडेकर, यांच्याबरोबर ग.त्र्यं. माडखोलकर हे प्रथितयश कादंबरीकार होत. ‘मुक्तात्मा’, ‘नवे संसार’, ‘स्वप्नांतरिता’, ‘नागकन्या’, ‘भंगलेले देऊळ’, आदी कादंबर्‍या प्रसिद्ध आहेत. यशस्वी नाटककार म्हणून नाव मिळवलेल्या भा. वि. वरेरकर तथा मामा वरेरकर यांच्या ‘विधवाकुमारी’, ‘धावता धोटा’ या कादंबर्‍या विशेष गाजल्या. या कादंबर्‍यांतून वरेरकरांनी सामाजिक मराठी कादंबरीतील वास्तवतेला अधिक व्यापक स्वरूप दिले. गिरणगावांतील मजुरांच्या कष्टमय जीविताचे चित्रण त्यांनी मराठीत प्रथम केले.
भाग (१) | भाग (२) | भाग (३)

मराठी कथा :

‘कथा’ हा मराठी साहित्यपरंपरेचा एक प्रमुख व मौलिक घटक आहे. कालप्रवाहात तिचा विकास-विस्तार होत गेला. मराठी कथेची मुळे महाराष्ट्रातील मातीत रुजलेली आहेत. इथल्या जीवनव्यवहाराची व्याप्ती आणि परंपरा तिने जोपासली आहे. जातककथा, लोककथा, रामायण-महाभारतावर आधारित कथा, पौराणिक कहाण्या, व्रतकथा, महानुभाव संप्रदायाच्या ग्रंथांतील कथा, सांप्रदायिक कथा, एकोणिसाव्या शतकात विविध भाषांतून मराठीत भाषांतरित झालेल्या कथा, स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा, स्वातंत्र्योत्तर काळातील वास्तववादी कथा, ग्रामीण कथा, दलित कथा, आदिवासी कथा असे तिचे विश्र्व विराट आहे.   स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी कथापरंपरा :
अव्वल इंग्रजी कालखंडात मराठी कथात्म लेखनाचे जे प्रयत्न झाले, ते बहुतांशी भाषांतरित अथवा रूपांतरित स्वरूपाचे होते.अर्वाचीन मराठी कथारचनेचा प्रारंभ तंजावर येथे सर्फोजी राजांनी केला. त्यांनी इ.स. १८०६ मध्ये ‘बालबोध-मुक्तावलि’ हे इसापाच्या कथांचे भाषांतर करवून घेतले. वैजनाथ पंडितांनी ‘सिंहासन बत्तिशी’ (१८१४), ‘पंचतंत्र’(१८१५), ‘हितोपदेश’ (१८१५), व ‘राजा प्रतापादित्याचे चरित्र’ (१८१६) हे ग्रंथ लिहिले. हे सर्व ग्रंथ कमी अधिक प्रमाणात भाषांतरित आहेत. नीतिकथा, बोधकथा, दंतकथा, ऐतिहासिक कथा, शृंगारिक कथा अशा अनेक कथाप्रकारांची सरमिसळ या ग्रंथांमध्ये झालेली दिसते. डॉ. रामजी गणोजीकृत ‘स्त्रीचरित्र’ (१८५४) या कथासंग्रहात मुख्यत्वेकरून शृंगारिक कथा आहेत. या संकलनात शुकबहातरीपासून अरबी कथेपर्यंतच्या विविध गोष्टी भाषांतरित वा रूपांतरित स्वरूपात आहेत. ‘नारायणबोध’ (१८६०), कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्या ‘अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी’ (१८६१-१८६५), चिंतामण दीक्षित-जोशी यांनी केलेले ‘विदग्ध स्त्री चरित्र’ (१८७१) हे शृंगारकथांचे संकलन, गोविंद शंकर बापटकृत ‘इलिझाबेथ’ अथवा ‘सिबिरिया देशातील हद्दपार कुटुंब’ (१८७४), ‘पाल आणि व्हर्जिनिया’ (१८७५), ‘हरि आणि त्रिंबक’ (१८७५), रावजी वासुदेव साठेकृत ‘रसिकप्रिया अथवा डिकॅमेरॉन’ (१८७९) हा अनुवाद - हे ग्रंथ सुरुवातीच्या काळात निर्माण झाले.   अद्‌भूतरम्यता आणि शृंगारिकता यांचे प्राबल्य असलेल्या अव्वल इंग्रजी कालखंडातील कथात्म वाड्मयाला जीवनस्पर्शी बनवले ते हरिभाऊ आपटे यांनी.  तो काळ सामाजिक प्रबोधनाचा होता. विधवाविवाह, बालविवाह, जरठबालाविवाह, केशवपनाची चाल असे अनेक-तत्कालीन समाजाला ग्रासणारे प्रश्र्न त्यांच्या कथांतून या ना त्या स्वरूपात दिसतात. हरिभाऊंनी तत्कालीन युगधर्माशी आपल्या साहित्याची सांगड घातली. राष्ट्रीयत्व व स्वातंत्र्याकांक्षा आणि सामाजिक सुधारणावाद ह्या या युगधर्माच्या दोन अंगांची टिळक व आगरकर ही दोन प्रतीके! हरिभाऊंनी आपल्या साहित्याच्या प्रपंचात ही दोन्ही अंगे विकसित केली. त्यांच्या कथालेखनाची सुरुवात खर्‍या अर्थाने ‘कानिटकर आणि मंडळी’ यांच्या ‘मनोरंजन’ मासिकातून झाली. पुढे त्यांच्या स्वत:च्या ‘करमणूक’ साप्ताहिकातून त्यांचे बरेचसे कथालेखन झाले. ‘करमणूक’ साप्ताहिकातून प्रसिद्ध होणारी त्यांची ‘स्फूट गोष्ट’ ही आधुनिक वळणाची कथा आहे, म्हणूनच हरिभाऊ आपटे हे आधुनिक मराठी कथेचे जनक होत. इ.स. १८८५ ते १९१० हा लघुकथेच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण असा पहिला टप्पा मानला जातो. त्यावर नि:संशयपणे हरिभाऊ आपटे यांची नाममुद्रा आहे.  इ.स. १९१० ते १९२५ या काळात मराठीतील नामवंत लेखकांनी - शि. म. परांजपे, न. चिं. केळकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि वा. म. जोशी यांनीही-कथालेखन केले. ‘कथा’ या साहित्यप्रकाराची मोहिनी ‘मासिक मनोरंजन’ मुळे वाढली. आपल्या कारकीर्दीत ‘मनोरंजन’ ने स्त्री - लेखिकांना उत्तेजन दिले. काशीताई कानिटकर, गिरिजाबाई केळकर, आनंदीबाई शिर्के यांचे कथालेखन ‘मनोरंजन’ मध्ये सुरू झाले व बहरले. वि.सी. गुर्जर, दिवाकर कृष्ण हे कथाकार ‘मनोरंजन’ मधूनच नावारूपास आले. त्या काळात गुर्जरांच्या कथांना खूप लोकप्रियता मिळाली.
हरिभाऊ आपटे यांच्या ‘स्फूट’ गोष्टीला गुर्जरांनी ‘संपूर्ण गोष्ट’ बनवले. तर दिवाकर कृष्णांनी तिला ‘कथा’रूप बहाल केले. ‘अंगणातला पोपट’ या त्यांच्या पहिल्या कथेनेच रसिक वाचकांना आकर्षित केले. अल्प कथालेखन करूनही दिवाकर कृष्णांनी मराठी कथेला नवे वळण दिले. निवेदनामधील वैविध्य, भाषेचा प्रत्ययकारी वापर, तरल अनुभवही व्यक्त करण्याची शैली ही त्यांची वैशिष्ट्ये नोंदवता येतात.   ना.सी. फडके आणि वि. स. खांडेकर यांनी १९४५ पर्यंत मराठी वाचकांवर एकप्रकारे अधिराज्य गाजवले. फडके सुखवादी तर खांडेकर आदर्शवादी! त्यांचे ध्येयवादी नायक, त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणार्‍या रूपसुंदर नायिका, त्यांची भाषा यांची विलक्षण मोहिनी तत्कालीन मराठी वाचकांवर होती.
इ. स. १९२० ते १९४० या कालखंडात महाराष्ट्रातील समाजजीवन व कौटुंबिक जीवन यांत झपाट्याने बदल होत होते. मार्क्सवादी विचारांच्या परिचयाने बरीच मानवी दु:खे मानवनिर्मितच असतात याचे भान येऊ लागले होते. भारतातील स्वातंत्र्य चळवळीमुळे जीवनाकडे बघण्याचे नवे परिमाण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला लाभले. स्थिर शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचे रूपांतर झपाट्याने उद्योगव्यवसायावर आधारित गतिशील अशा व्यवस्थेत होऊ लागले. एकत्र कुटुंबांची जागा हळूहळू विभक्त कुटुंबे होऊ लागली. सुशिक्षित, पदवीधर स्त्रियांची सं‘या वाढू लागली. प्रौढविवाह रूढ झाले. स्त्रीच्या जीवनात नव्याने निर्माण होऊ लागलेले ताण या काळात विभावरी शिरूरकर, कृष्णाबाई, कमलाबाई टिळक इत्यादी लेखिकांनी शब्दबद्ध केले. लघुकथेच्या फडकेप्रणीत साच्याकडे दुर्लक्ष करून कथेला तंत्रमुक्त केले ते कुसुमावती देशपांडे यांनी!  लक्ष्मणराव सरदेसाई, ग.ल.ठोकळ, र.वा. दिघे ह्यांच्या कथावर फडके यांच्या रंजनवादी लेखनतंत्राचा खूप प्रभाव दिसतो. तर य.गो. जोशी, महादेवशास्त्री जोशी आणि चिं.वि. जोशी यांच्या या काळातील कथांतून फडके-खांडेकर यांच्या प्रभावातून सुटण्याचा प्रयत्न दिसतो. फडके यांच्या रेखीव रचना- तंत्राची थट्टा करणारी ‘ग्यानबा तुकाराम आणि टेक्निक’ ही कथा य. गो. जोशी यांनी लिहिली. रसरशीत अभिव्यक्ती असणारे महादेवशास्त्री जोशी आणि मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांची सुखदु:खे, जय-पराजय सहजतेने विनोदी कथांमधून आविष्कृत करणारे चिं.वि.जोशी हे मराठीतील महत्त्वाचे कथाकार आहेत. चिं.वि.जोशी यांच्या ‘वरसंशोधन’, ‘स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग’, ‘माझे दत्तक वडील’ इत्यादी कथांमधील अकृत्रिम, सुसंस्कृत आणि सहज विनोदाला मराठीत तोड नाही.
बी. रघुनाथ यांच्या कथांनी मराठवाड्यातील माणसांच्या जीवनाचे दर्शन घडवले. त्याचप्रमाणे श्री.म. माटे यांनीही ‘उपेक्षितांच्या अंतरंगात’ डोकावून पाहिले. कथारूपाच्या प्रस्थापित संकेतांचे दडपण झुगारून या दोन्ही लेखकांनी कथालेखन केले. वामन चोरघडे यांच्या कथांतून भाषेचे, निवेदनाचे प्रयोग सहज घडत गेले. माणसाचे मन संपन्न करणारी त्यांची कथा आहे.
स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी कथा : दुसर्‍या महायुद्धानंतरच्या या काळात साहित्यातून व्यक्त होणार्‍या आशयाचे स्वरूप मुळापासून बदलले. कथेचा प्रस्थापित असा रूपबंध या बदललेल्या आशयाला कवेत घ्यायला अपुरा पडू लागला. त्यामुळे नवा रचनाबंध घडवणे अपरिहार्य ठरले. कथेतील कथानक, पात्र इत्यादी घटक तेच राहिले, तरी या घटकांच्या संकल्पना मुक्त, लवचीक बनल्या. त्यामुळे मराठी कथेने जणू कात टाकली. गंगाधर गाडगीळ, पु. भा. भावे, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर, शांताराम, सदानंद रेगे, दि. बा. मोकाशी यांच्या कथांतून कथेची नवी रूपे मूर्त होऊ लागली. अश्लीलता, दुर्बोधता, वैफल्यग्रस्तता, जंतुवाद, कुरूपता, बीभत्सता असे अनेक आरोप नवकथेवर - विशेषत: गाडगीळांच्या कथेवर व मर्ढेकरांच्या कवितेवर-झाले. त्यातून अनेक वाद-प्रतिवाद झडले, काव्य-शास्त्र चर्चा रंगल्या. त्यामधून जे विचारमंथन झाले त्यातून नव्या जाणिवा घडल्या, रुजल्या आणि यथावकाश त्या विस्तारल्या! आधुनिक नागर जीवनाचे यथार्थ दर्शन घडवणारी गाडगीळांची कथा, सश्रद्ध आणि आशावादी दृष्टीने आश्र्वासक वाटणारी अरविंद गोखले यांची कथा, अपारंपरिक आशयसूत्रे सूक्ष्म आणि तरलपणे मांडणारी पु. भा. भावे यांची कथा आणि माणदेशी मातीचा रूपगंध घेऊन आलेली व्यंकटेश माडगूळकरांची कथा यामधून ‘नवकथा’ हे नामाभिधान मिरवणारी कथा संपन्न झाली. व्यापक नैतिक प्रश्र्नांना भिडणारी शांताराम (के.ज. पुरोहित) यांची कथा, सौम्य आणि संयतपणे सामान्यांच्या जीवनाचा वेध घेणारी दि. बा. मोकाशी यांची कथा, तिरकस शैलीतून फँटसीच्या अंगाने अनुभव शब्दांकित करणारी सदानंद रेगे यांची कथा यांमुळे मराठी कथा समृद्ध बनली.   इ. स. १९६० च्या आसपास नवकथेतून निर्माण झालेली नवी कथादृष्टी स्थिरावली. पण त्याचबरोबर एक प्रकारचे साचलेपण, कथेत निर्माण होऊ लागले. जुने संकेत नाकारत असताना कथा नव्या संकेतांच्या बंधनात अडकते की काय - असे वाटू लागले. जी. ए कुलकर्णी, कमल देसाई, विजया राजाध्यक्ष, विद्याधर पुंडलिक, शरच्चंद्र चिरमुले, श्री. दा. पानवलकर, शंकर पाटील, ए. वि. जोशी, तारा वनारसे, सरिता पदकी, ज्ञानेश्र्वर नाडकर्णी, वि. शं. पारगावकर अशी कथाकारांची नवी पिढी या काळात जोमाने लेखन करू लागली. यांतील प्रत्येक कथाकाराचे लेखन त्याच्या त्याच्या कलानिर्मितीच्या प्रेरणांशी सुसंगत आहे.
 जी. ए. कुलकर्णी यांनी आपल्या ‘निळासावळा ते रक्तचंदन’ (१९६६) या संग्रहांतल्या कथांतून मानवी जीवनाचे शोकात्म भान व्यक्त केले. मानवी नेणिवेतील खोलवरच्या मनोव्यापारांचे चित्रण त्यांच्या अनुभवविश्र्वाला व्यामिश्र बनवते. आपल्या कथानिर्मितीने जी. एं. नी मराठी कथा साहित्यातील ‘एक मानदंड’ अशी मान्यता मिळवली.   माणसाच्या मूलभूत एकटेपणातील उदास भाव - हे पुंडलिकांच्या कथांचे महत्त्वाचे आशयसूत्र आहे. सनातन श्रद्धेच्या रहस्याचा शोध घेणार्‍या त्यांच्या कथांतील अनुभवांना अनेकदा गूढतेचा स्पर्श झालेला दिसतो. (उदा. दवणा, जन्म इ.)
श्री. दा. पानवलकर यांची कथा कथानक, पात्रचित्रण, वातावरण, निवेदन आणि भाषा - या सर्वच अंगांनी आपले वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण दाखवते. पोलीस खाते, कस्टम्स, संस्थानी परिसर यांतील अनुभवांचे रंगेल आणि रांगडे पुरुषी जग त्यांनी चित्रित केले. आनंद विनायक जातेगावकर (मुखवटे-१९७४) यांनी मध्यमवर्गीय माणसाची साचेबंदपणाची, अजस्त्र कंटाळ्याची जाणीव शब्दबद्ध केली, तर शरच्चंद्र चिरमुले (श्रीशिल्लक-१९६७) यांनी असाधारण घटना व पात्रे यांच्या निर्मितीमधून जीवनाचे अर्थपूर्ण पण वैचित्र्यपूर्ण रूप दाखवले. ए. वि. जोशी (कृष्णाकाठचे देव, १९६१) यांनी मोजके परंतु दमदार कथालेखन केले. ज्ञानेश्र्वर नाडकर्णी हे या कालखंडातील एक प्रतिभाशाली लेखक (चिद्घोष-१९६६). आपल्या कथांतून त्यांनी काहीशा जगावेगळ्या, वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या माणसांचे जीवनरंग दाखवले. प्रतिमासृष्टीतील मौलिकता आणि अनोखेपण यासाठीही त्यांचा विशेष उल्लेख करावा लागतो.

मराठी कविता :

प्राचीन कालखंडापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत (इ.स.२०००) मराठी कवितेची वाटचाल कशी होत गेली, कोण कोणती नवी वळणे, नवी रुपे तिने धारण केली, आणि त्या प्रत्येक कालखंडामध्ये कोणकोणते मुख्य कवी निर्माण झाले, त्यांच्या कवितेने मराठी कवितेचा आशय आणि अभिव्यक्ती कशी बदलत गेली याचे विहंगमावलोकन प्रस्तुत लेखात केलेले आहे. आत्तापर्यंत `मराठी' तून लिहिणारे दोन कवी -कुसुमाग्रज व विंदा करंदीकर यांना साहित्य प्रांतातील, भारतातील सर्वोच्च पुरस्कार `ज्ञानपीठ पुरस्कार' प्राप्त झालेला आहे. मराठी कविता वैयक्तिक आहे, सामाजिक व राष्ट्रीय आहे, तसेच ती वैश्विकही आहे. वैयक्तिक अनुभव, सुख-दु:खे, मराठी बाणा, देशभक्ती, सामाजिकता इत्यादी सर्व क्षेत्रांना व्यापणारी अशी मराठी कविता आहे.कवींची अभिव्यक्ती तसेच रसिकांना विविध प्रेरणा व आनंद ही दोन्ही उद्दिष्टे लक्षणीयरीत्या साधणारी कविता म्हणजे मराठी कविता होय.   (कवितेचा एकूण कालखंडाचा आवाका प्रचंड आहे आणि लेखाची एकंदर स्थलमर्यादा लक्षात घेता अनेक कवींचा उल्लेख राहुन गेलेला असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. परंतु उल्लेख न केलेले कवी देखील महत्त्वाचे असू शकतात याचे भान नक्कीच आहे! अधिकाधिक सर्वस्पर्शी माहिती देण्याचा प्रयत्न आहे.)
मराठी कवितेचा इतिहास :
वास्ताविक मराठी वाङ्मयाचा इतिहास प्राचीन नसुन मध्ययुगीन म्हणावयास हवा. मराठी भाषेचा गौरव सर्वप्रथम जर कोणी केला असेल तर तो एक पोर्तुगीज माणसाने, ही घटना निश्चितच उल्लेखनीय म्हणावी लागेल.
भारताच्या सुवर्णभूमीचे आकर्षण वाटून इ.स.१४७८ साली वास्को -द-गामा व्यापाराच्या निमित्ताने भारतामध्ये आला आणि भारताचे प्राक्तन बदलून गेले. १५६७ पासुन ख्रिस्ती धर्मप्रचाराचे धोरण ठरविण्यासाठी धर्मपरिषदा भरु लागल्या. नव्या धर्माविषयी मराठी माणसाला प्रेम वाटावे आणि भक्तिकथा सरयुक्त मराठी पुराणांना पर्यायी अशी रचना असावी म्हणुन फादर स्टीफन्स या परकीय धर्मप्रसारकानी येशु ख्रिस्ताची महती सांगणारा ‘ख्रिस्तपुराण’ हा ग्रंथ मराठी भाषेत लिहुन महराष्ट्र सारस्वतामध्ये मानाचे स्थान मिळविले.
मुकुंदराज : मराठीचे आद्यकवी
मुकुंदराजांचा ‘विवेकसिंधु’ हा मराठी मधील पहिला ग्रंथ इ.स. ११८८ मध्ये लिहिला गेला. त्या काळामध्ये सर्व प्रकारचे शास्त्रीय, ज्ञानात्मक विवेजन हे संस्कृत भाषेमध्ये होत असे. मराठी सारख्या देशी भाषेतुन ग्रंथ लिहिण्याची प्रथाच नव्हती. त्यामुळे संस्कृत भाषेमध्ये जे अपरंपार ज्ञानभांडार होते, त्यापासून मराठी सामान्यजन वंचित रहात होता. हे ज्ञानभांडार मराठीमध्ये आणणे आवश्यक आहे हे मुकुंदराजांनी ओळखले. आणि म्हणून तत्कालीन सर्व संकेत बाजुला ठेऊन मुकुंदराजांनी आपला ग्रंथ मराठीमध्ये लिहिला. मुकुंदराजांच्या या कृतीनंतर अठराव्या शतकापर्यंत सर्व प्रमुख कवींनी आणि ग्रंथकारांनी मराठी भाषेत कवित्व तसेच तात्विक विवेचन करण्याचे धाडस आणि समर्थन केले आहे. असे असले तरी वैदिक संस्कृतीचा मराठी संस्कृतीशी प्रथम सांधा जुळविला तो मुकुंदराजांनी!
चक्रधरस्वामी आणि त्यांचा महानुभावपंथ बाराव्या शतकाच्या अखेरीस मुकुंदराजांनी जे कार्य केले ते तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात महानुभाव पंथाने अतिशय नेटाने पुढे नेले. ‘संस्कृत हीच ज्ञानभाषा आहे' हा संकेत महानुभाव पंथानेही धुडकावून दिला. आणि ज्ञानाभिव्यक्तिचे सुलभ साधन म्हणून मराठी भाषेचा गौरवाने स्विकार केला.
महानुभाव लेखकांचे सात ग्रंथ ‘साती ग्रंथ’ म्हणुन प्रसिद्ध आहेत. १. शिशुपाल वध                  - शक ११९५   - कवी भास्करभट बोरीकर २. एकादशस्कंध                  - शक ११९६   - कवीश्वर भास्कर ३. वत्सहरण                      - शक १२००   - दामोदरपंडित ४. रुक्मिणीस्वयंवर              - शक १२१०   - कवी नरेंद्र ५. ज्ञानबोध                        - शक १२५४   - विश्वनाथ बाळापूरकर  ६. सह्याद्रिवर्णन                   - शक १२५४   - खळो व्यास ७. ऋद्धपुरवर्णन                   - शक १२८५   - नारायण पंडित
आद्य कवयित्री ‘महादंबा’ महानुभाव पंथातील महदंबाकृत ‘धवळे’ हे एक रसाळ काव्य आहे. या काव्यामुळे महदंबेकडे आद्यकवयित्रीचा मान जातो.  महानुभाव पंथातील या लेखकांनी व कवींनी मराठी भाषेचे ऐश्वर्य व सामर्थ्य वाढविण्याचे काम केलेले आहे. त्यांनी बाळगलेला मराठी भाषेचा अभिमान हा मराठी भाषेवर मोठे उपकारच म्हणावे लागेल.
संत ज्ञानेश्र्वर महाराजांनी केलेला मराठी भाषेचा गौरव मराठी भाषेचा अतिशय ज्वलंत अभिमान आणि उत्कट प्रेम ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्र्वरीमध्ये’ जागोजागी व्यक्त केलेला. आपली मराठी भाषा ही प्रौढ व रसाळ आहे ह्याची सार्थ जाणीव त्यांना आहे.
‘‘माझा मर्‍हाठाचि बोलु कौतुके। परि अमृतातेंहि पैजासि जिंके।   ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन’’
अशा शब्दात त्यांनी मराठीचा गौरव केला आहे. आद्यकवी मुकुंदराज आणि ज्ञानेश्र्वर महराज यांच्यामध्ये एका शतकाचे अंतर आहे. दोघांचाही संप्रदाय व तत्त्वज्ञान एकच आहे. (नाट्यसंप्रदाय) या दोघांनीही अद्वैत सिद्धांताचा मराठी भाषेत प्रसार केला. संस्कृत भाषेचे जसे एक अंगभूत लावण्य आहे तसेच मराठी भाषेचेही अंगभूत लावण्य आहे हे ज्ञानेश्र्वर महाराजांनी ‘ज्ञानेश्र्वरी’ या ग्रंथातून दाखवून दिले. श्रीगुरु, कृष्णार्जुन, गीता, संत, मराठीभाषा, भक्तिज्ञानावैराग्य या सर्वांविषयी उत्कट प्रेमभावना ज्ञानेश्र्वरी या ग्रंथात आहे. विश्वाच्या वाङ्मयात हा ग्रंथ थोर समजला जातो.
संत नामदेव वारकरी संप्रदायामध्ये संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त म्हणुन लोकप्रिय होते. अत्युत्कट भक्तिप्रेमाने ओथंबलेली अभंगराचना त्यांनी केली. या भक्तिभावाच्या जोरावर त्यांनी ज्ञानदेवांचे व समकालीन संतमंडळींचे प्रेम जिंकले. नामदेवांची सर्व रचना स्फुट अभंगाची आहे.
वारकरी संप्रदायातील संतकवींच्या काव्याचे स्वरूप
आपल्याकडे ‘भावकविता’ हा शब्दप्रयोग, आधुनिक कवितेच्या संदर्भात मुख्यत: वापरला जातो. परंतु याचा अर्थ असा नाही की पुर्वी भावकविताच नव्हती. संतांच्या काव्यात ओवी, अभंग, गौळणी, पदे, लोकगीते, विराण्या, पाळणे, भूपाळ्या, लावण्या अशा विविध स्वरुपात भावकविताच अविष्कृत झालेली आहे. अशी विशुद्ध भावकविता लिहिणारे संत कवी म्हणून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत एकनाथ, संत चोखामेळा, समर्थ रामदास इत्यादी सर्वच संतांचा उल्लेख करायलाच हवा.
संत कवयित्री मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, सोयराबाई, निर्मळा, भागु आणि कान्होपात्र या संतकवयित्रिंनी आपल्या भावसंपन्न कवितेने मराठी कविता समृद्ध केली.  मुक्ताबाईंचे ‘मुंगी उडाली आकाशी’ तिने गिळिले सुर्याशी’ हा कूटरचनापर अभंग किंवा त्यांचे ‘मजवरी दया करा। ताटी उघडा ज्ञानेश्र्वरा’ हे ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत. जनाबाईंनी ‘विठो माझा लेकुरवाळा। संगे लेकुरांचा मेळा।’ असे वारकरी संप्रदायाचे हृदयंगम चित्र रेखाटले. त्यांच्या डोईचा पदर आला खांद्यावरी। भरल्या बाजारी जाईन मी’ हा अभंग अतिशय प्रक्षोभक, स्त्रीजाणिवेचा आदय हुंकार म्हणावा लागेल.  सोयराबाईंचा ‘रंगी रंगला श्रीरंग। अवघा रंग एक झाला’ हा अभंग आजही अवीट गोडीने ऐकला जातो. संत कवयित्रींच्या काव्यरचनेमध्ये वेगवेगळे आकृतिबंध दिसतात. पुढील काळातील कवयित्रींनाही ते मार्गदर्शक ठरते आहे.
पंडिती काव्य :
तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील शेवटचे कवी मानले जातात. त्यापुढील कालखंडात म्हणजे १६५० ते १८०० पंडिती काव्य निर्माण झाले. या कालखंडाला वामन-मोरोपंतांचा कालखंड म्हटले जाते. या कालखंडाने मराठीच्या भांडारात अपार भर घातलेली आहे. मध्वमुनीश्वर, अमृतराय, महिपति, वामनपंहित, मोरोपंत हे महत्त्वाचे कवी या कालखंडात झाले. या कवींनी फक्त निवृत्तीपर रचना केली नसुन प्रवृत्ती-निवृत्ती यांचा मिलाफ त्यांच्यामध्ये झालेला आहे. या काळातील काव्य वैराग्याकडून संसाराकडे वळत चाललेले दिसते. पुढे शाहिरी काव्याने तर शृंगार रसाचा कळस गाठला.
शाहिरी काव्य :
शाहिरी काव्य म्हटले की पोवाडे आणि लावण्या हे दोन रचना प्रकार चटकन डोळ्यासमोर येतात. पोवाडा आणि लावणी यांचे मुळ अस्सल ‘मर्‍हाटी’ आहे. शाहिरी वाङ्मयाची सुरुवात शिवकालात झाली आणि नाट्य, नृत्य, संगीत या अंगाने तिचा विकास पेशवाईत झाला. मुख्यत: जनसमुदायाच्या रंजनासाठी म्हणुन लावणी, पोवाडे रचले नि गायले गेले. मन्मथस्वामी, ज्योतीराम, प्रभाकर, होनाजी बाळा, सगनभाऊ, परशराम, रामजोशी हे त्या काळातील महत्त्वाचे शाहिरी कवी होत. प्राचीन मराठी काव्याचा हा इतिहास पाहिला तर तो संत, पंत आणि तंत अशा कवींच्या कामगिरीवर विभागलेला आहे. पहिल्या कालखंडाने अध्यात्माची व निवृत्तीची शिकवण दिली. पुढील कालखंडात माहपती मुक्तेश्वर, श्रीधर यांनी आपल्या रसाळ ग्रंथांनी मराठी भाषा जोपासली, वाढविली आणि तिसर्‍या कालखंडात ती अधिक तरुण बनली. विविध रस तिच्यातून व्यक्त होऊ लागले. पुढे १८१८ मध्ये स्वराज्याचा अस्त झाला आणि मराठी काव्यही निस्तेज झाले. १८८५ पासुन मात्र पुन्हा एकदा मराठी काव्य जोमाने पुढे आले.
अर्वाचीन मराठी कविता
१८८६ ते १९२० हा कालखंड अर्वाचीन मराठी कवितेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या कालखंडामध्ये मराठी काव्याच्या नव्या युगाची नांदी झाली. या आधीच्या कालखंडात संतकाव्य, पंडिती काव्य आणि शाहिरी काव्य, अशा तीन काव्यधारा होत्या. या तीनही परंपरा हळूहळू क्षीण होत गेल्या. १८८५ च्या सुमारास महाराष्ट्रामध्ये पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव दिसू लागला.व्यक्तिस्वातंत्र्यवाद आणि सौदर्यवाद या दोन महत्त्वाच्या प्रवृत्तींचा संस्कार प्रभावी मराठी मनावर झाला. या सौदर्यवादी जाणिवा वाङ्मयाला पोषक ठरल्या. विशेषत: कवितेवर या सौंदर्यवादाचा मोठा प्रभाव पडला.
१८८५ मध्येच आधुनिक कवितेची चाहूल विष्णु मोरेश्र्वर महाजनींच्या ‘कुसुमांजली’ आणि महादेव मोरेश्र्वर कुंटे यांच्या ‘राजाशिवाजी’ या दोन काव्यांमधून लागली. आशय आणि अभिव्यक्ति या दोनही अंगाने मराठी कवितेचे रुप आमुलग्र बदलणार याची चिन्हे दिसू लागली.
केशवसुत : आधुनिक मराठी कवितेचे जनक
केशवसुतांची पिढी इंग्रजी भाषा शिकलेली, त्या भाषेतील साहित्याने प्रभावित झालेली पहिली पिढी होती. खुद्द केशवसुतांवर कीटस्, शेली, वर्डस्वर्थ यांचा संस्कार झालेला होता.
केशवसुतांच्या आधी मराठी काव्याचे विषय देव-देवता, नीति-अनीती, राजे-राजवाड्यांच्या पराक्रमाचे वर्णन यांपुरतेच मर्यादित होते. संतकाव्यामागील लेखनप्रेरणा मुख्यत: आध्यात्मिक होती. पंडिती कवींनी वैयक्तिक भावभावना वर्ज्य मानल्या होत्या. आणि शाहिरी काव्य राजे-रजवाड्यांच्या स्तुतिपलीकडे पोचत नव्हते. अशा पार्श्र्वभुमीवर केशवसुतांनी ऐहिक विषय; लौकिक भावभावना यांची आपल्या काव्यामधून अभिव्यक्ती केली. भावगीत हेच काव्याचे खरे क्षेत्र आहे हे प्रथमत: केशवसुतांनी दाखवुन दिले. केशवसुतांनी काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या.  १. विशुद्ध भावगीतात्मक जाणीव                २. प्रणयप्राधान्य भावनेला महत्त्व                    ३. निसर्गप्रेम  ४. सामाजिक विचार                               ५.गूढगुंजन                                               ६.सुनीत हा नवा काव्यप्रकार ह्या भावभावना, हे घटक / विषय, नवे काव्यप्रकार कवितेत समाविष्ट केले. अशी आशय आणि अभिव्यक्ति या दोन्ही बाजुने केशवसुतांनी मराठी काव्यामध्ये बंडखोरी केली. ‘हरपले श्रेय’, ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’, ‘झपुर्झा’, ‘स्फुर्ती’, ‘सतारीचे बोल’ - अशा एकाहून एक श्रेष्ठ कविता लिहून त्यांनी आधुनिक मराठी कवितेचे रुप सिद्ध केले. आधुनिक मराठी कवितेतील सर्व प्रवाह - उदा. सामाजिक व राष्ट्रीय कविता, गूढ गुंजनात्मक कविता इत्यादी... केशवसुतांच्यात कवितेपासून सुरू झाल्याचे दिसतात म्हणूनच त्यांना आधुनिक मराठी कवितेचे `जनक' म्हटले जाते.
केशवसुतांच्या काळात नारायण वामन टिळक हे ही एक महत्त्वाचे कवी होते. मात्र आवर्जुन नाव घ्यायला हवे ते बालकवी उर्फ त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे! बालकवींच्या कवितेत सौंदर्यवादाच्या प्रेरणा अतिशय उत्कटपणे एकवटलेल्या आहेत. आत्यंतिक निसर्गप्रेम, दिव्यत्वाची अनावर ओढ, उत्कट आणि प्रगाढ उदासिदनता, चैतन्याचा निजध्यास ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. फुलराणी, खेड्यातील रात्र, उदासिनता, औदुंबर, तडाग असतो, श्रावणमास या त्यांच्या कविता मराठी काव्यामध्ये अजरामर आहेत.
गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी हे देखील आधुनिक मराठी कवितेच्या संदर्भातील महत्त्वाचे नाव आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी होते. अनेक परस्परविरोधी प्रवृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एकवटलेल्या होत्या. अभिजातवाद आणि सौंदर्यवाद यांचे एक चमत्कारिक मिश्रण त्यांच्यामध्ये दिसते. त्यांच्यामध्ये अफाट प्रतिभासामर्थ्य होते यात शंका नाही. विफल प्रीतीची कविता हे त्यांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. विनोद हे त्यांचे आवडते क्षेत्र होते. ‘विहिणींचा कलकलाट’, ‘हुकमे हुकूम’, ‘चिंतातुर जन्तू’, ‘एक समस्या’ अशा काही विनोदी कविता प्रसिद्ध आहेत.
या कवींसोबत कवी दत्त, माधवानुज, रेंदाळकर, बी. नागेश रहाळकर, कृ. ना. आठल्ये, मो. वा कानिटकर, ग.ज.आगाशे, सुमंत, साधुदास या कवींनी आधुनिक मराठी कवितेच्या जडणघडणीस हातभार लावला.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सावरकरांच्या जीवनात साहित्यनिर्मितीला दुय्यम स्थान असले तरी मराठी काव्यक्षेत्रात त्यांचे नाव कोरले गेलेले आहे. वीररस, देशभक्ती, कल्पनेचे भव्यत्व, विचारप्रधानता, तरल भावुकता इत्यादी दर्शन त्यांच्या काव्यात घडते. सागरास(ने मजसि ने...), माझे मृत्यूपत्र, कमला, गोमंतक अशा कविता प्रसिद्ध आहेत. जयोस्तुते हे स्वातंत्र्यदेवतेचे गीत, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची `जयदेव जयदेव जयजय शिवराय' ही आरती यांवरूनही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्फूर्तिदायी काव्यप्रतिभेची जाणीव आपल्याला होते.

No comments:

Post a Comment